मुंबई : संपूर्ण विश्व कोरोनाशी झगडत असताना भारतीय औषध निर्मिती कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचं बोललं जात आहे. यात सर्वांत मोठी घडामोड म्हणजे गेल्या 10 दिवसांत अमेरिकन अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल 4 भारतीय कंपन्यांना अमेरिकेत औषध निर्मितीसाठी परवानगी दिली आहे.
जगभरात विविध औषधांचा तुटवडा भासत असताना भारतीय कंपन्या मात्र हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा अखंड पुरवठा करत आहेत. तर काही भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत औषध निर्मितीसाठी परवानगी मागितली होती. पण, ती आतापर्यंत देण्यात आली नव्हती. पण, आता मात्र अमेरिकेने भारतीय औषध कंपन्यांना आपल्या देशाची दारे उघडली आहेत.
परवानगी मिळालेल्या या कंपन्यांत लुपीन, डॉ. रेड्डी या आघाडीच्या औषध उत्पादकांसह बंगळुरू येथील स्ट्राईड्स फार्मा आणि बायोकॉम यांचा समावेश आहे. दरम्यान, या कंपन्या आता अमेरिकेत उत्पादन सुरू करणार , अशी माहिती समोर येताच सोमवारी शेअर बाजारात या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पुरवठा करण्यावरून भारताने वापरलेल्या कुटनीतीचा हा विजय असल्याचं बोललं जात आहे.