संपूर्ण शिरूर तालुका हादरला
शिक्रापूर-येथील एका डॉक्टरला करोनाची लागण झालेली असून त्याचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शिक्रापूरसह संपूर्ण शिरूर तालुका हादरला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका सोनोग्राफी सेंटर मधील डॉक्टरला त्रास होऊ लागल्याने आणि त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी प्रथम पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले आणि तेथे डॉक्टरच्या करोना बाबतच्या तपासण्या करण्यात आल्या असता करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
पुन्हा नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली असताना त्यामध्ये देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद, तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सरपंच जयश्री भुजबळ यांसह आदींनी शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटर असलेल्या ठिकाणी धाव घेत पाहणी करून परिसरात फवारणी केली. सोनोग्राफी सेंटरदेखील बंद केले आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला असलेल्या आठ कामगारांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे; परंतु सोनोग्राफी सेंटर चालक व करोना बाधित डॉक्टरने चार दिवसांत तब्बल दीडशे रुग्णांची सोनोग्राफी केलेली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर येथे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे. पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून विशेष काळजी घेत या परिसरामध्ये नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर गावाला जोडणारे सर्व बाजूचे रस्ते पूर्णपणे बंद करून गावच संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
- शिक्रापूर येथील तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, सोनीग्राफी सेंटर सील करत त्यातील आठ कामगार तपासणीसाठी पाठविले आहे. याठिकाणी सोनोग्राफीसाठी आलेल्या 144 नागरिकांची दररोज तपासणी करत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल.
-डॉ. प्रज्ञा घोरपडे, तळेगाव ढमढेरे प्रा. आरोग्य केंद्र
- या डॉक्टरचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; परंतु एनआयव्हीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून परिसरात फवारणी करत इतर कार्यवाही करण्याचे काम सुरु केले आहे.
-डॉ. राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी
- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे; परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.
-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक शिक्रापूर
- वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
शिक्रापूर येथील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार श्रीशैला व्हट्टे, तलाठी अविनाश जाधव यांनी शिक्रापूर गावाला भेट दिली. आरोग्य विभागाला या सोनोग्राफी सेंटरमध्ये आलेल्या 144 लोकांची नावे व पत्ते शोधून त्यांना योग्य माहिती देत, काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.