मुंबई – दक्षिण आफ्रिकेत करोनाचा अधिक संसर्ग क्षमता असलेला नवा प्रकार आढळून आल्यामुळे जागतिक व्यापारावर आणि उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी कमी झाल्या.
न्यूयॉर्कमधील क्रुड बाजारांमध्ये आज क्रुडचा दर पाच टक्क्यांनी कमी होऊन 74 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेला. जागतिक व्यापार कमी होणार असल्यामुळे उद्योगांची उत्पादकताही घटणार आहे. अशा अवस्थेत तेलाची गरज कमी लागेल. या कारणामुळे कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्याच आठवड्यामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी करण्यासाठी अमेरिका, भारत, चीन, जपान, ब्रिटन या देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. क्रुडची मागणी वाढत असताना क्रुड उत्पादक देशानी उत्पादन कमी केल्यामुळे सध्या क्रुडचे दर जास्त पातळीवर आहेत असे भारतासह अनेक देशांचे म्हणणे आहे.