नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत त्यामुळे सरकारने आता तरी इंधनाचे दर कमी करावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे. त्यांनी कच्चा तेलाच्या संबंधातील वृत्ताचे कात्रण आपल्या ट्विटर अकौंटला जोडले आहे.
त्यात म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या घसरलेल्या िंकंमती लक्षात घेतल्या तर पेट्रोलचा दर प्रतिलिटर आठ रूपयांनी कमी होऊ शकतो. आजपर्यंत इंधन दरवाढीचा जो कहर भारतात झाला आहे, तो आता थांबला पाहिजे आणि पेट्रोल डिझेलचे दर आता तरी तातडीने कमी झाले पाहिजेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
या इंधनदरवाढीच्या विरोधात त्यांनी ट्विटरवर फूल लूट असा हॅशटॅगही चालवला आहे. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही कच्चा तेलाच्या घसरलेल्या किंमती लक्षात घेऊन देशातील इंधन दरवाढीवरील लूट सरकारने त्वरीत थांबवावी अशी मागणी केली आहे.
मोदी सरकार लूटजीवी सरकार असल्याची टीकाही सुर्जेवाला यांनी केली आहे. हे सरकार गरीब, मध्यमवर्ग आणि नोकरदाराच्या पाकिटावर डल्ला मारत आहे असे नमूद करून सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, आता निदान जवळ आलेल्या निवडणूका लक्षात घेऊन तरी सरकारने इंधन दरवाढ कमी केली पाहिजे.