‘प्रभात’च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन
वडूज – “ज्ञानोबा माउली, तुकाराम’, “बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात वडूज येथील सिद्धीविनायकाचा वार्षिक रथोत्सव आज उत्साहात झाला. या रथोत्सवात पंचक्रोशीतील भाविक व सुवासिनींनी गर्दी केली होती. पारायण सभा मंडपात सकाळी ह. भ. प. शाम महाराज आळंदीकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली. ह. भ. प. विजय महाराज लोणीकर (शिंदे) यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर 11 वाजता ह. भ. प. जयंत कुलकर्णी यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता आकर्षक रथात गणपती व ज्ञानेश्वरी माअली यांच्या प्रतिमा ठेवून पारायण मंडळाचे विश्वस्त, मान्यवर व नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रथपूजन झाले.
दुपारी 1.30 वाजता रथ मिरवणुकीला सुरवात झाली. रथापुढे टाळ, मृदंग घेतलेले वारकरी, भजनी मंडळे, बॅंड पथके विविध शाळांची लेझीम पथके आणि डोक्यावर कलश घेऊन सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. रथ मिरवणूक बाजार पटांगणातून कराड-दहिवडी रस्ता, छ. शिवाजी चौक, बसस्थानक, पेडगाव रोड, मुख्य पेठे, शेतकरी चौक, या मार्गाने काढण्यात आली.
सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळांच्यावतीने मिरवणुकीतील भाविकांना ठिकठिकाणी अल्पोपहार, पाणी व सरबत वाटप करण्यात आले. रथ मार्गावर महिलांनी सडा, रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले. ठिकठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. भाविकांनी नारळाची तोरणे, रोख रक्कम रथावर अर्पण केली. त्यानंतर हरिदास ज्ञानदेव जाधव, ईश्वर ज्ञानदेव जाधव व मित्र परिवार (सुधीर फर्निचर वडूज) यांच्यातर्फे भाविकाना महाप्रसाद देण्यात आला.
हेमाडपंती वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या काशीविश्वेवर मंदिरातील पिंडीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथोत्सवास आलेल्या भाविकांनी सिद्धीविनायकाबरोबर काशीविश्वेवर मंदिरात दर्शन घेतले. रथोत्सवात खेळण्यांची दुकाने, विविध आकाराचे पाळणे, मेवामिठाईची दुकाने सजली होती. मिरवणूक संपल्यावर रथावर जमलेली रक्कम मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
रथोत्सवनिमित्त दैनिक “प्रभात’ने आज प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार गोडसे, प्रकाश माळी, राजू शेटे, शरद गोडसे, नामदेव शेटे, शहाजी गोडसे, विजय जगदाळे, विजय शिंदे (लोणीकर महाराज), युवा उद्योजक ईश्वर जाधव, “प्रभात’चे तालुका प्रतिनिधी नितीन राऊत उपस्थित होते. मान्यवरांनी पुरवणीचे कौतुक केले.