शाहूपुरीत महावितरणकडून दुर्लक्ष; नागरिकांच्या तक्रारी बेदखल
सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत महावितरणचे विद्युत खांब कित्येक वर्षे वाकडेतिकडे झाले आहेत तर अनेक खांब गंजल्याने अपघातांचा धोका आहे. विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे बॉक्सही उघडे आहेत. याबाबत शाहूपुरीकरांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत नागरी सोयीसुविधांचा अभाव आहे. महावितरणचे असंख्य ग्राहक शाहूपुरी परिसरात असूनही त्यांना महावितरणकडून सेवा, सुविधा पुरवल्या जात नाहीत. महावितरणने बसवलेले विद्युत खांब गंजले असून काही खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. अनेक खांब वाकडेतिकडे झाले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॉन्सफार्मरचे बॉक्स उघड्यावर आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असल्याने जीवित वा वित्तहानीचा धोका संभवतो.
शाहूपुरीकरांनी अनेक तक्रारी केल्या तरी त्यांच्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याशिवाय काहीच केले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. केवळ लोखंडी खांब नव्हे तर सिमेंटचे खांबही कलले आहेत. जिल्हा परिषद कॉलनीतील गणेश मंदिराजवळील गंजलेला एक विद्युत खांब दुसऱ्या गंजलेल्या खांबावर पडला आहे. तेथे केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
शाहूपुरी चौकात असलेले दोन्ही विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या दारेच नाहीत. हे ट्रान्सफॉर्मर जमिनीपासून केवळ दोन फुटांवर असून लहान मुले, जनावरांनाही यापासून धोका संभवतो. आंबेदरे रस्त्यालगत गणेशनगर येथे देशमुख यांच्या घराजवळील खांबही वाकले आहेत. महावितरणने हे खांब तातडीने बदलून ट्रान्सफॉर्मरच्या बॉक्सना दारे बसवावीत, अशी मागणी होत आहे. या तक्रारींबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विद्युत खांब गंजलेले आणि वाकलेले आहेत. ट्रान्सफॉर्मरचे बॉक्सही उघडे आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणीही केली. मात्र अद्याप उपाययोजना केलेल्या नाहीत. एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी महावितरणने
उपाययोजना करण्याची गरज आहे. – राजेंद्र मोहिते, ग्रामपंचायत सदस्य.