एकदिवसीय संपात कर्मचाऱ्यांचा सहभाग : नागरिकांना नाहक त्रास
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 91 ठिकाणच्या पोस्ट कर्मचाऱ्यांसह अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पोस्ट कार्यालयांसह शासकीय कार्यालयांत कमालीचा शुकशुकाट होता. या संपामुळे मात्र. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. खेड तालुक्यात टपाल कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील टपाल सेवांवर मोठा परिणाम झाला. तालुक्यातील छोटी मोठी तब्बल 91 पोस्ट कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. राजगुरूनगर सब डिव्हिजन व राजगुरूनगर कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
जुनी पेन्शन योजना बहाल करणे, खात्यातील खासगीकरण थांबवणे, सातव्या वेतन आयोगामधील सर्व त्रुटी दूर करणे, अनुकंपा तत्वावर 5 टक्के मर्यादा रद्द करणे, ग्रामीण डाकसेवकांचा कमलेशचंद्र कमिटीचा रिपोर्ट आहे तसा लागू करणे, रोजंदारी, कॅज्युअल, कॉन्टीजन्ट, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना खात्यात कायम करणे, कामगार विरोधी कायदे बिल रद्द करणे, ट्रेड युनियनवरील हल्ले थांबवणे आदी मागणीसाठी शासकीय पातळीवरील संघटनांनी एकदिवसीय संप पुकारला होता. खेड तालुक्यात या बंदला मोठा प्रतिसाद लाभला. तालुक्यातील पोस्टांच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी घोषणा देत बंद पुकारला.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या पी 3 चे अध्यक्ष डी. एम. कोकणे यांनी तर पी-4 चे अध्यक्ष विठ्ठल डोंगरे यांनी केले. यावेळी सचिव अनंत वाघमारे, कार्याध्यक्ष संजय मराठे, बबन मिरजे, महेश पाचंगे, शिवाजी कोकणे, लोकेश चव्हाण, सुधाकर कुलकर्णी, सुरेश पाचारणे, परभत जमदाडे, किसान डोंगरे, आनंद देखणे, योगेश सांगाडे आदी उपस्थित होते.