ढेबेवाडी कराड-ढेबेवाडी रस्त्यावर रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. कोळे ते आयटीआय कॉलेज मानेगाव या रोडवरील दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. काही झुडपे रस्त्यावर आली आहेत.
अनेकदा झुडपांमुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. मोठी दुर्घटना घडण्याअगोदर संबधित विभागाने ही झुडपे काढावीत, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
कराड-ढेबेवाडी रस्त्याचे रुंदीकरण झाले असलेतरी या रस्त्यावरील वाढता वाहतुकीचा ताण पाहता बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
वळणावरील दिशादर्शक बोर्ड पूर्णपणे झुडपांनी व वेलींनी झाकून गेले आहेत. या रस्त्याच्या बाजूला व दुभाजकावरील वाढणारे गवत, झुडपे याची साफसफाई वेळेवर होत नसल्याने हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. तरी, संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून या मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाढलेली झुडपे व गवत काढण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.