कराड – कराड शहरातील करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन कराड नगरपालिकेने येथील टिळक हायस्कूलमध्ये दि. 6 ऑगस्टपासून ऍन्टीजेन टेस्टला प्रारंभ केला आहे. या टेस्टमुळे शहरातील नागरिकांना तात्काळ करोना अहवाल प्राप्त होणार आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर कराड शहरात करोना प्रार्दुभाव वाढला आहे. शहरातील प्रत्येक पेठेत करोनाचे रूग्ण सापडत आहेत.
शहरातील करोना बाधितांचा आकडा 200 च्या घरात पोहोचला आहे. शहरातील तीनही कोव्हिड सेंटर फुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने नागरिकांना फिव्हर क्लिनिक सुरू केले असून येथे नागरिकांनी ताप आल्यास प्राथमिक तपासणी करून उपचार दिले जात आहेत.
तर गुरूवारी येथील टिळक हायस्कूलमध्ये ऍन्टीजेन टेस्ट करण्यासाठी कक्ष उभारला आहे. या कक्षात करोनाबाधित रूग्णाच्या निकट सहवासित नागरिकांची तात्काळ टेस्ट करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जात आहे.