वॉशिंग्टन – भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांचा कार्यकाळ संपत आला असून आज त्या पार्श्वभूमीवर श्रृंगला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांच्या ओव्हल कार्यालयात भेट घेतली. भारताच्या दूताचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने त्याची अमेरिकेच्या अध्यक्षांनी भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. श्रृंगला यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी जे सहकार्य दिले त्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले.
श्रृंगला यांची भारताचे विदेश सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यासाठी ते वॉशिंग्टनहून नवी दिल्लीला परत जात आहेत. गेल्या वर्षी म्हणजे सन 2019 मध्ये त्यांची 9 जानेवारी रोजी अमेरिकेतील भारताचे दूत म्हणून नियुक्ती झाली होती. आता ते येथून मायदेशी परत जात असल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी इंडिया हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला.