पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात मंगळवारी (दि.14 सप्टेंबर) “रंग महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना महाराष्ट्रातील विविध पारंपरिक गीत प्रकार ऐकता येणार आहे.
ट्रस्टच्या वतीने 19 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या एकसष्ठीनिमित्त “रंग महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेचा वेध घेण्यात येणार आहे. यामध्ये भूपाळीपासून ते पोवाड्यापर्यंत आणि गणगवळणीपासून ते भारुडापर्यंत वैविध्यपूर्ण गाण्यांचे सादरीकरण ही रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमात चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अंजली मराठे आणि सहकारी सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे निवेदन स्वानंदी टिकेकर करणार आहेत. ट्रस्टच्या www.bhaurangari.com या संकेतस्थळावरुन कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.