श्री विठ्ठल मंदिर 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात

मंदिर समिती बैठकीत ऐतिहासिक निर्णय

सोलापूर  – संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी आळंदीहून येऊन जे विठ्ठल मंदिर पाहिले. जगद्गुरू तुकोबांनी ज्या मंदिरात आपल्या भक्तीरसपूर्ण अभंगांमधून विठुमाऊलीला साद घातली, जे संतांचं माहेरघर आहे; ते जुनं विठ्ठल मंदिर म्हणजेच सोनं. आणि तेच सोनं आता नव्याने दिसणार आहे. तब्बल 700 वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिर जसं होतं; तसं पुन्हा एकदा साकारणार आहे. म्हणजेच जे ज्ञानोबांनी पाहिले, जे तुकोबांनी अनुभवले, तेच मंदिर जसं होतं तसंच पुन्हा एकदा विठूभक्तांना पाहायला मिळणार आहे.

“नाही घडविला, नाही बैसविले’ अशी महती असणारं विठुरायाचं सावळं रूपडं जसं वारकऱ्यांना भावते. तसंच विठुरायाचं राऊळही वारकऱ्यांच्या मनात घर करतं. सावळं रूपडं जसं होतं तसंच असलं; तरीही विठुरायाचं राऊळ मात्र तसंच राहिले नाही. त्यात काळानुरूप बदल घडले. आता ते बदल हटवून जसं होतं तसं मंदिर पुन्हा एकदा उभारलं जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याबाबत बैठक झाली.

या बैठकीला मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पुरातत्त्व विभागाच्या पॅनलवरील वास्तुविशारद श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागाचे पुरातत्त्व विभागाचे सहाणे हे उपस्थित होते. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार विठ्ठल मंदिर हे 14 व्या शतकातील यादव कालीन आहे. नंतरच्या काळात मूळ मंदिर जसंच्या तसं ठेवून अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. ते सर्व बदल हटवून आता ज्ञानोबा-तुकोबांच्या काळात म्हणजे सुमारे 700 वर्षांपूर्वी मंदिर जसं होतं तसं रूप आता देण्यात येणार आहे. नामदेव पायरी पासून विठ्ठल गाभाऱ्यापर्यंत हे सर्व बदल केले जाणार आहेत.

मंदिराचे काम बारा टप्प्यात
जुनं रूप देण्यासाठी सविस्तर विकास आराखडा बनविण्यात येत आहे. मंदिराचे काम बारा टप्प्यात केले जाणार आहे. यासाठी अंदाजे 40 ते 45 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा आराखडा पूर्ण झाल्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मंदिराचे आयुष्य वाढणार असून मूळ विठ्ठल मूर्तीची झिजसुध्दा कमी होईल, असे पुरातत्त्व विभागाचे मत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.