नवी दिल्ली – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून झायडस कॅडिलाच्या लशीला लवकरच आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सप्टेंबरपासून ही लस देता येऊ शकते, अशी माहिती लस विषयक राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे.
झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्यांचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. तसेच भारत बायोटेकची लहान मुलांसाठीची कोवॅक्सिन लसही लवकरच उपलब्ध होऊ शकते. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून, त्या सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात 12 ते 18 वर्षे वयातील मुलांचे लसीकरण ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते असे सांगितले जाते आहे.
दरम्यान, देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कालच आरोग्य क्षेत्रासाठी एक पायाभूत सुविधा पॅकेज जाहीर केले आहे. 9 महिन्यांत हे पॅकेज लागू केले जाणार असून, या अंतर्गत देशातील 736 जिल्ह्यात बालरोग केंद्रे सुरू केली जातील आणि त्यात मुलांसाठी सुमारे 4 हजार आयसीयू बेड असतील.
गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे, त्यामुळे लस लवकर आल्यास मुलांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित करता येईल आणि शाळा, महाविद्यालय सुरू करता येतील. मुलांच्या लसीकरणाशी संबधित विविध मुद्द्यांवर गांभिर्याने विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.