Sai Tamhankar: अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील एक गाणं रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत श्रेयस तळपदे देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांनी तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे आता चाहते देखील दोघांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.
यापूर्वी 2008 साली ‘सनई चौघडे’ हा मराठी सिनेमा रिलीज झाला होता. यात सुबोध भावे, श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, आणि सई ताम्हणकर हे कलाकार होते. ‘सनई चौघडे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 16 वर्षे उलटून गेली आहेत. आता ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
दरम्यान, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील ‘दिल मे बजी गिटार’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील हे धमाल बॉलिवूड स्टाईल गाणे सई आणि सिद्धार्थवर चित्रित झालं असले तरी गाण्याच्या शेवटच्या कडव्यात श्रेयस तळपदेचीही एन्ट्री होते.
गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
यातून सई आणि श्रेयसची केमिस्ट्री पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ मधील या गाण्याला काही वेळातच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच श्रेयस तळपदेचं सरप्राईज चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. दरम्यान, पुढील महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमा रिलीज होणार आहे.