सौ. वेदांतिकाराजे; दोन्ही राजांच्या प्रचारार्थ कोपरा सभांना गर्दी
सातारा – लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि सातारच्या विकासासाठी दोन्ही राजे नेहमीच कार्यरत आहेत. काही भूछत्रे निवडणुकीपुरती उगवतात. त्यांना नेहमीसारखा घरचा रस्ता दाखवा आणि गतिमान विकासासाठी दोन्ही राजांना निवडून द्या, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी गुरुवार परज आणि केसरकर पेठ येथे झालेल्या कोपरा सभांमध्ये त्या बोलत होत्या.
नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, सौ. स्मिता घोडके, निशांत पाटील, अल्लाउद्दीन शेख, श्रीकांत आंबेकर, सौ. अनिता घोरपडे, विजय काटवटे, राजू भोसले, अमोल मोहिते, शकील बागवान, सौ. स्नेहा नलवडे, विशाल जाधव, प्रकाश बडेकर, जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, सलीम कच्छी, मुख्तार पालकर, हेमंत कासार, वझीर कुरेशी, रशीद सय्यद, अन्वर पालकर, धनंजय पारखी, इंतेखाब बागवान, चंदन घोडके व नागरिक उपस्थित होते.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, पक्षबदल ही नवीन गोष्ट आहे का? यापूर्वी अनेकांनी किती तरी वेळा पक्ष बदलले. काही जण स्वार्थासाठी तर काही जण मतदारसंघाच्या विकासासाठी पक्ष बदलतात. त्यामुळे उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मेडिकल कॉलेज, अजिंक्यताऱ्यावरील शिवसृष्टी, कास धरणाची उंची, ही कामे मार्गी लागतील. तुम्ही 40 वर्षात काय केले, असे विरोधक विचारतील. त्याचे उत्तर जनताच देईल. निवडणुकीपुरता सातारकरांचा कळवळा दाखवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्या. गुरुवार परज येथील सभेत मुस्लिम बांधवांनी सौ. वेदांतिकाराजे यांचा सत्कार केला.
आपचा पक्ष फक्त राजे
निशांत पाटील, प्रकाश बडेकर, विजय काटवटे, नासीर शेख, शरद काटकर, अशोक मोने, अन्वर पालकर, रशीद सय्यद, सौ. घोरपडे, सौ. घोडके, आंबेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सातारकरांना पक्ष कोणता, हे माहीत नसते. आपला पक्ष म्हणजे दोन्ही राजेच आहेत. सातारकरांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता दोन्ही राजांच्या पाठीशी खंबीर रहावे, असे आवाहन त्यांनी केले.