चंद्रकांत पाटील यांना जेरीस आणणार – अंकुश काकडे

कोथरूड मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला होता; परंतु त्यावेळी भाजप कोथरूडमधून कोणाला उमेदवारी देणार, याची कल्पना नव्हती. परंतु अचानक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन आपला उमेदवार द्यायचा का, याविषयी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी चर्चा केली.

एकच उमेदवार द्यावा असा विचार आला. त्यावेळी उमेदवार देण्यापेक्षा मनसेच्या शिंदे यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अंकुश काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी कॉंग्रेस नेते अभय छाजेड उपस्थित होते.

शिंदे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीही विरोध केला नाही. हा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर केला आहे. दोन्ही पक्ष अतिशय जिद्दीने लढत देण्याचा प्रयत्न करू. तसेच पाटील यांना कसे जेरीस आणायचे याची रणनीती दोन दिवसांत ठरेल, असेही काकडे यांनी सांगितले.

पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यात येणे हेच योग्य नव्हते. त्यांना कोथरूडकरांनी जी प्रतिक्रिया उमटली आहे ती सर्वांनी पाहिली आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार उभा करण्यापेक्षा मनसेलाच पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही एकत्रित घेतल्याचे छाजेड म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.