पार्किंगमध्ये कार आणि कारचालकाला नोटीस
बरेली – उत्तर प्रदेश वाहतूक पोलिसांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून, कोणत्याही निकषाद्वारे नागरिकांकडून दंड वसुली करणे, या गोष्टीने त्यांना ग्रासलेले आहे. बरेली वाहतूक पोलिसांनी एका नागरिकाला हेल्मेट न घालता वाहन चालवल्याबद्दल दंडाची नोटीस पाठवली आहे. त्यावर तो वाहनाचा क्रमांक आहे, ती वास्तविक कार आहे,
जिला हेल्मेटचा नियम लागू होत नाही. शिवाय ज्या दिवशी हा गुन्हा घडला, असे पोलिसांचे म्हणणे आहे, त्यादिवशी संबंधित कारचालकाची ती कार गुरुग्राममध्ये घरात पार्किंग केलेली होती. मग ही नोटीस आली कशी, या विषयावर आता खमंग चर्चा सुरु झाली आहे.
मीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मानकरी गावातील रहिवासी नेमचंद यांनी यूपी पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर तक्रार केली आहे. नेमचंद यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी त्यांची कार घरात उभी होती. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यावर त्याच्या गाडीचा नंबर लिहिलेला होता. यासोबतच दुचाकी दाखवून हेल्मेट न चालवल्याबद्दल त्यांना एक हजार रुपयांची दंडाची नोटीसही पाठवण्यात आली.
या नोटीसीमध्ये एका बाईकचा फोटोही आहे, ज्यावर दुसराच क्रमांक लिहिलेला दिसत आहे. त्यामुळे नेमचंद यांच्या कारचा नंबर बाईकचा नंबर म्हणून कसा दाखवला गेला, याविषयी गूढ निर्माण झाले आहे. नेमचंद यांनी ट्विट करून यूपी पोलिसांकडे तक्रार केली आहे, ज्यामध्ये त्यांना चौकशीनंतर निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वाहतूक पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.