केवळ 21 शाळांनीच मागितली परवानगी
पिंपरी – शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली काढण्यासाठी ठेवलेल्या जाचक अटींमुळे यावर्षी शहरातून शालेय सहली निघण्याचे प्रमाण घटले आहे. सहलीच्या जाचक अटींमुळे शाळा कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसल्याने यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरातून आतापर्यंत केवळ 21 शाळांनीच सहलीची परवानगी घेतली आहे. अनेक शाळांनी नियमांची पूर्तता करण्यापेक्षा सहलच न कढलेली बरी अशी भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने मागील काही वर्षांपासून शैक्षणिक सहलीसंदर्भात विविध नियम तयार केले होते. दोन वर्षांपूर्वी हे नियम शिथिल करण्यात आले. मात्र, यावर्षीपासून पुन्हा नव्या अटी टाकल्या आहेत. शैक्षणिक सहलीसंदर्भात 27 नियम तयार करण्यात आले आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातून महापालिका तसेच खासगी शाळांनीही मोठ्या प्रमाणात सहली काढल्या होत्या. मात्र, यावर्षी आता द्वितीय सत्र सुरू होऊन दोन महिने झाले तरी आतापर्यंत शिक्षण विभागाकडे केवळ 21 शाळांनीच सहलीसाठी परवानगी मागितली आहे. जाचक नियमांमुळे शैक्षणिक सहली निघालेल्या नाहीत. नव्याने आलेल्या नियमात शैक्षणिक सहल काढताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी “हमीपत्र’ द्यावे लागत असल्याने शाळेतील शिक्षण सहली नेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
विनापरवाना सहली
सहलीसाठी जाचक अटी असल्यामुळे काही शाळा तर परवानगीविनाच कोणतेही निकष न पाळता गुपचूप सहली काढत आहेत. सहलीला निघण्यापूर्वी पालकांनी शाळेला संमतीपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, हे निकष पाळले जात नसल्याचे दिसत आहे. तसेच काही खासगी शाळांकडून स्वत:च्या स्कूलबसचा वापर केला जात आहे. तसेच ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणीच शाळेची सहल काढावी असा नियम आहे. मात्र, बहुतांश शाळा हे नियम पाळत नसल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शाळा सहलीला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. यावर्षी आमच्याकडे आतापर्यंत केवळ 21 शाळांनी परवानगी मागितली आहे. सहलीसंदर्भात नव्याने आलेल्या अध्यादेशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
– पराग मुंढे, शिक्षणाधिकारी