सातारा – आरटीओ कार्यालयाच्या नव्या प्रवेशद्वारासमोरील दोन दुकानांना शॉर्टसर्किटने आग लागून संगणक व इतर महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुकानांपैकी एका दुकानाचे नाव वटवृक्ष आहे. रात्री नऊच्या दरम्यान ही घटना निदर्शनास आल्यानंतर नागरिकांची एकच पळापळ झाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी येऊन ही आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ कार्यालयासमोर एजंटांचे परवाने काढून देणे तसेच इतर दाखल्यांच्या सुविधा देणारे गाळे एका ओळीत आहेत. कार्यालयाच्या नव्या प्रवेशद्वारासमोरील वटवृक्ष आणि आणि त्या शेजारील अन्य एक दुकान रात्री नऊ वाजता बंद केल्यानंतर अचानक वटवृक्ष दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. त्या दुकानाची आग शेजारच्या दुकानात पसरली. दोन्ही दुकानांना पत्र्याचे शेड असल्यामुळे ही आग झपाट्याने पसरली.
एका दुकानातील कॉम्प्युटर आणि लायसनचे सर्व साहित्य महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आग धुमसत होती. नागरिकांनी तात्काळ एका दुकानाचे शटर मोठ्या प्रसंगावधानाने उघडून आगीला वाट मोकळी करून दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ पाण्याचा मारा सुरू केला आणि आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये संबंधित दुकानांचे मोठे नुकसान झाले.