नवी दिल्ली – चॅंगवॉन (कोरिया) येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नवोदित नेमबाज अर्जुन बबुता याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात हे यश प्राप्त केले. त्याने ही कामगिरी करताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील रजतपदक विजेता ल्युकास कोझिनीस्की याच्यावर मात केली.
वरिष्ठ गटात अर्जुनने मिळवलेले हे पहिलेच पदक ठरले आहे. यापूर्वी त्याने 2016 साली अझरबैजानमध्ये झालेल्या ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. अर्जुनचा सहकारी खेळाडू पार्थ माखिजा याला मात्र, पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या
दोघांनी पात्रता फेरीत अफलातून कामगिरी करत मुख्य फेरीत प्रवेश केला होता. या खेळाडूंना ऑस्ट्रियाचे नामवंत प्रशिक्षक थॉमस फार्निक यांनी प्रशिक्षण दिले आहे. भारताच्या नोमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झालेल्या फार्निक यांच्यासाठीही हे पहिलेच पदक ठरले आहे.