सातारा (प्रतिनिधी) – शेतजमिनीवर झोपडी टाकल्याच्या रागातून पिंप्रद, ता. फलटण येथे महुली (मौली) झबझब पवार या वृद्धेच्या डोक्यात दगड घालून, झोपडी पेटवून तिचा खून केल्याच्या गुन्ह्यात त्याच गावातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती; परंतु यातील फिर्यादी व साक्षीदार असलेल्या नातेवाइकांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या गुन्ह्यात आधी अटक केलेल्या संशयितांबाबतचा अहवाल न्यायालयात पाठवल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. या प्रकरणी कल्पना अशोक पवार (मूळ फिर्यादी), अशोक झबझब पवार, कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोप अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (रा. अलगुडेवाडी, ता.फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, पिंप्रद हद्दीत कल्पना अशोक पवार (वय 45 रा. अलगुडेवाडी) या महिलेने खरेदी केलेली जमीन गट नं. 3 वहिवाटू नये, म्हणून त्याच गावातील भगत व मोरे कुटुंबांशी वाद सुरू होता. त्यातून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. भगत व मोरे कुटुंबीय कारागृहात डांबले गेल्यास आपल्याला जमीन कसता येईल, असा विचार करून, कल्पना पवार व तिच्या नातेवाइकांनी दि. 10 रोजी महुली झबझब पवार हिच्या डोक्यात दगड घालून तिला अर्धमेली केली. त्यानंतर संशयितांनी तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले होते.
या प्रकरणी कल्पना पवारच्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे (रा. पिंप्रद) यांना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, फिर्यादी व साक्षीदारांच्या माहितीमध्ये विसंगती दिसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावर जमिनीचा वाद कायम संपवण्यासाठी आणि भगत, मोरे कुटुंबांना दबावाखाली ठेवण्यासाठी झबझब पवारचा संशयितांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवली.
सातारा पोलिसांच्या तपास कौशल्याची राज्यात चर्चा
अत्यंत क्लिष्ट प्रकरण असतानाही, धीरज पाटील यांनी हेरलेला संशयितांचा दुटप्पीपणा, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सहकाऱ्यांची समयसूचकता यामुळे फिर्यादी व तिचे साक्षीदार हेच संशयित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भगत व मोरे यांच्यावरील अन्याय टळला आहे. सातारा पोलिसांच्या तपास कौशल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे.
घटना घडल्यानंतर महुली पवारच्या घरातील दोघे पसार झाल्याचे लक्षात आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर बनाव उघड झाला. त्यानंतर इतर संशयितांना अटक केल्याचे धीरज पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, रवी वाघमारे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, संकेत निकम, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, प्रवीण अहिरे, महेश पवार, अनिकेत जाधव, संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.