दादाज्‌ इलेव्हन-दीक्षित रॉयल्स्‌ यांच्यात अंतिम लढत

पुणे  – लायन्स्‌ क्‍लब पुणे रहाटणी तर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ “लायन्स्‌ करंडक’ प्रौढ (40 वर्षांवरील गट) टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्णधार पुष्कराज जोशीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिक्षित रॉयल्स्‌ने पासाळकर रॉयल्स्‌चा 8 गडी राखून सहज पराभव केला. यानंतर आता दादाज्‌ इलेव्हन आणि दिक्षित रॉयल्स्‌ यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पासाळकर रॉयल्स्‌ला आश्‍वासक कामगिरी करता आली नाही. करू किंवा मरू अशा सामन्यात पासाळकर रॉयल्सचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिल्याने पासाळकरचा डाव 14.3 षटकात 73 धावांवर गडगडला. निलेश पासाळकर (11), देविदास दरगुडे (11) आणि श्रीनिवास सरवदे (11) हे फलंदाज दुहेरी धावा करू शकले.

दिक्षित संघाचा कर्णधार पुष्कराज जोशीने 13 धावात 3 गडी टिपत महत्त्वाची भुमिका बजावली. याबरोबरच दिलीप मॅथ्यु (3-15) आणि रघुनाथ शिंगाडे (2-5) यांनी दुसऱ्या बाजुने मोलाची साथ दिल्याने पासाळकरचा डाव झटपट गुंडाळला गेला. हे आव्हान दिक्षित रॉयल्स्‌ने 9.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. अमित पार्ले (नाबाद 37 धावा) आणि पुष्कराज जोशी (नाबाद 16 धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

उपांत्य फेरी : 1) पासाळकर रॉयल्स ः 14.3 षटकात सर्वबाद 73 धावा (निलेश पासाळकर 11, देविदास दरगुडे 11, श्रीनिवास सरवदे 11, पुष्कराज जोशी 3-13, दिलीप मॅथ्यु 3-15, रघुनाथ शिंगाडे 2-5) पराभूत वि. दिक्षित रॉयल्सः 9.5 षटकात 2 बाद 74 धावा (अमित पार्ले नाबाद 37, पुष्कराज जोशी नाबाद 16, अमिर नावकर 11); सामनावीरः पुष्कराज जोशी;

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.