इस्केंदर : तुर्कस्तान, सिरियातील प्रलयकारी भूकंपातील बळींची संख्या आता तब्बल २४ हजारांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याशिवाय, जखमी झालेल्या नागरिकांची संख्याही हजारोंच्या घरात गेली असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर मृतांच्या संख्येतही आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुर्कस्तान, सिरियात जसे दिवस उलटत आहेत तसे ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली आहे. तुर्कस्तानशिवाय युद्धग्रस्त सीरियात ३,३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती काल रात्री उशीरापर्यंत समोर आली होती.
Pulling a two-month-old baby alive after three days under the rubble in Turkey.#TurkeySyriaEarthquake
pic.twitter.com/E2d0tC8X15— Nilofar Ayoubi (@NilofarAyoubi) February 8, 2023
दरम्यान, तुर्कस्तानच्या इस्केंदरनमधील बचावकर्त्यांनी सुमारे १०१ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांची शुक्रवारी सकाळी सुटका करण्यात आली आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात एका छोटय़ाशा जागेत एकत्र राहिल्याने सहा जण वाचू शकल्याचे बचाव कर्मचारी मुरत बेगुल याने सांगितले. हे सहाही जण परस्परांचे नातलग आहेत.
गझियन्तेप शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका किशोरवयीन मुलाची सुटका केल्यानंतर त्याच्या आप्तस्वकियांना जल्लोष केला होता. जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली असताना, अशा घटनांमुळे बचाव पथकाचा बचावकार्यासाठीचा जोम वाढत आहे. तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी ३५ लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे. काही शहरांच्या रस्त्यांवर पांघरूण, गालिचे व कापडांत गुंडाळलेले मृतदेह पडले आहेत. शवागार व स्मशानभूमीवरही ताण वाढला आहे. या भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे.