नवी दिल्ली – अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू असून इंडियाना प्रांतातील पार्ड्यू विद्यापिठातील एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळला आहे. तर शिकागोमध्ये एक आयटी शाखेच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या या हल्ल्यांच्या घटना २०२४ या नवीन वर्षातील सहावी घटना आहे.
पार्ड्यू विद्यापिठातील समीर कामथ हा मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी वॉरेन कौंटीमध्ये मृतावस्थेत आढळला. एका नैसर्गिक अरण्यामध्ये आढळून आला, असे वॉरेन कौंटीच्या कोरोनेरने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
समीर कामथ याने मॅसेच्युसेटस ऍमहेर्स्ट विद्यापिठामधून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळवली होती आणि तो पार्ड्यू विद्यापिठातून संशोधन कार्यक्रमाचा अभ्यास करत होता.
दुसऱ्या घटनेमध्ये सईद मझहर अली या आयटी शाखेच्या विद्यार्थ्याचा पाठलाग करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला. शिकागो शहरामध्ये त्याच्या निवासस्थानाजवळ तीन अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्याच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार झाले. अली मूळचा हैदराबादेतील असून ६ महिन्यांपूर्वीच तो अमेरिकेत गेला आहे. इंडियाना वेल्सेयान विद्यापिठामध्ये तो माहिती तंत्रज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतो आहे.