नवी दिल्ली – दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने दिल्ली विमानतळावर घबराट पसरली होती. ही धमकी मिळताच सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील यूके-971 या दिल्ली ते पुणे विमानात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा फोन सकाळी पावणेआठच्या सुमारास गुरुग्राममधील जीएमआर कॉल सेंटरमध्ये आला. माहिती मिळताच तातडीने कारवाई करत सर्व प्रवाशांसह त्यांचे सामानही विमानातून खाली उतरवण्यात आले.
या विमानात 100 हून अधिक प्रवासी आणि 5 क्रु मेंबर्स होते. त्यानंतर तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या स्वतंत्र जागी विमान नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. परंतु त्यात काहीही आढळले नाही. सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
प्रवाशांना सुखरूपपणे टर्मिनल इमारतीत नेण्यात आले. स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार सुरक्षा एजन्सी क्लिअरन्स देण्यात आल्यानंतर 8 तास उशीराने 4.30 वाजता विमान पुण्याकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.