निखील जगताप
बेलसर :पुरंदर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता करोनाने सर्वच वयोगटास बाधित केले आहे. जगातील सर्वच अभ्यासकांकडून करोना रोगाची दुसरी लाट संपवून लवकरच तिसऱ्या लाटेत रूपांतर होणार आहे.
ही तिसरी लाट लहान मुलांच्या वयोगटास धोकादायक ठरणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांची संख्या वाढत आहे. तथापि मोठ्यांसाठी आता लस उपलब्ध झाली तरी लहान मुलांना अद्याप ती दिली जात नाही, त्यामुळे लहान मुलांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
0 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये पोट दुखणे, ताप, उलट्या, जेवण न जाणे, जुलाब, खोकला, डिहायड्रेशन त्याचबरोबर इतर लक्षणे आढळून येत आहेत. तालुक्यातील आंबळे येथील सार्थक सेवा संस्थेच्या वसतिगृहातील 19 विद्यार्थ्यांना बाधा झाली होती. त्यामुळे तालुक्यामध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. करोनाची तिसरी लाट आल्यानंतर लहान मुलांना उपचारासाठी अनेक खस्ता खाव्या लागतील, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
सध्या शासनाने 18 ते 45 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती दिली असली, तरी देखील 45 वयोगटा वरील संपूर्ण लसीकरण तातडीने करण्यात यावे. त्याचबरोबर 18 ते 44 वयोगटातील सर्वांना त्वरित लसीकरण करावे. 0 ते 20 वयोगटातील मुलांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असे आवाहनही केले आहे. पुरंदरमध्ये लहान मुलांचे कोविड सेंटर उभारण्याची मागणी होत आहे.
वाढत्या करोना रुग्णांची संख्या पाहता लहान वयोगटातील मुलांची आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे भयभीत ग्रामस्थांकडून तालुक्यांमध्ये एक वेगळे लहान मुलांचे कोविड सेंटर उभारावे. त्यामध्ये बालरोगतज्ज्ञ, डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पुरंदर तालुक्यामधील 0 ते 12 वयोगटातील 1 एप्रिल ते 13 मे पर्यंत च्या 206 बाधित मुलांपैकी 133 मुले व 73 मुली आहेत. मुलींपेक्षा लहान मुलांमध्ये कोरोना रोगाचा जास्त प्रादुर्भाव पाहावयास मिळत आहे. त्यामुळे बाधित मुलांचा आकडा असाच वाढत राहिला तर पुरंदर साठी ही चिंतेची बाब ठरणार आहे.
6 ते 10 वयोगटातील मुलामुलींना जास्त संसर्ग
लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फ्लामेटरी(चखसिंड्रोम चे प्रमाण जास्त.
पाचवर्षाखालील मुलं ही आई-वडिलांच्या जास्त संपर्कात असल्याने त्यांना संसर्गाची शक्यता जास्त.
आठ वर्षावरील वयोगटातील मुले बाहेर खेळताना संपर्कात आल्याने बाधित.
लठ्ठपणा, दमा किंवा इतर आजार असलेल्या मुलांना करोना मुळे जास्त त्रास होण्याची शक्यता.
पुरंदर तालुक्यातील लहान वयोगटातील करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी सर्व मुलांची प्रकृती व्यवस्थित आहे. कमी लक्षणे असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. कोणालाही ऑक्सिजन, आयसीयू किंवा अधिक उपचाराची गरज पडली नाही. सर्व मुलेही कोविड सेंटरमध्येच बरी झाली आहेत.
त्यामुळे 97 टक्के रुग्ण हे नॉन सिम्टोमॅटिक तर 1 ते 2 टक्के रुग्ण हे माईल्ड सिम्टोमॅटिक आहेत. सद्यस्थितीला लहान मुलांसाठी वेगळे कोविड सेंटर उभारण्याची गरज नाही. परंतु प्रत्येक कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 10 बेड आपण राखीव ठेवू शकतो. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट नक्कीच तीव्र असली तरी तिसऱ्या लाटेचा अंदाज सांगू शकत नाही.
सध्या सद्यस्थितीला तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून पुरंदरच्या सर्व भागात कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमित सक्रिय पाठपुरावा सुरू आहे.
-उज्वला जाधव, तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर
मुलांची काळजी कशी घ्याल?
मुलांचे बाहेर जाणे टाळा.
जेवणात पोषक आहार असू द्या
मुलांना मास्क सॅनिटायझर चा वापर करण्यास समजून सांगा
अस्वच्छ हाताने डोळे नाक तोंडाला स्पर्श करू नका
काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या