धक्कादायक माहिती समोर; ISIने टाळली मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याच्या सूत्रधारांची अटक

नवी दिल्ली – आयएसआय अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याच्या सूत्रधारांची अटक टाळण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. लष्कर ए तोयबाच्या सात हस्तकांवर छापे टाकण्यात आले होते. त्यात जाकी उर रहमान या मुंबई हल्ल्याशी संबंध सिध्द झालेल्या दहशतवाद्याला सोडून देण्यात आले, असा दावा इंटरनॅशनल फोरम फॉर राईट अँड सेक्‍युरिटीने केला आहे.

दरम्यान, “डॉन’ या दैनिकात लिहलेल्या स्तंभात तारीक हुसेन हे पाकिस्तानातील प्रभावशाली नेते म्हणतात, मुंबईवर हल्ला करणारे हे लष्कर ए तोयबाचे सदस्य होते. यापुर्वी या दहशतवाद्यांना सिंध प्रांतात प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या दहशतवाद्यांचा नियंत्रण कक्ष कराचीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत सोडणारी बोट अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने जप्त केली आहे.

26/11 च्या हल्ल्यात 13 देशातील 166 जण मरण पावले. त्यांना न्याय देण्याची मागणी जगभरातून होत आहे. त्यासंदर्भात भारताने पुरावे सादर करूनही 13 वर्षानंतरही पाकिस्तानला त्याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

काही शस्त्रधारी आणि प्रशिक्षित व्यक्ती नि:शस्त्र नागरिाकांवर हल्ले करत त्यांना लक्ष्य बनवतात, त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद म्हणतात, अशी व्याख्या इंटरनॅशनल फोरम फॉर राईट अँड सेक्‍युरिटीने केली आहे. ती मुंबई हल्ल्याने अधोरेखीत होत आहे. अत्याधुनिक शस्त्रांसह छोट्या गटांनी हल्ले करण्याची पध्दत मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी अवलंबल्याचे पहायला मिळाले. पॅरिसमध्ये 2015 मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली.

अजमल कसाब, डेव्हिड हेडली आणि झबिउद्दीन अन्सारी यांच्या बॅंक खात्याचा तपशील समोर आल्यानंतर मुंबई हल्ला पाकिस्तान सरकार पुरस्कृत असल्याचे पुरावेच मिळाले होते. या तिघांनी या हल्ल्यात वेगवेगळ्या भूमिका निभावल्या होत्या. या तिघांच्या वेगवेगळ्या चौकशीत आयएसआय आणि लष्कर ए तोयबाने मिळून हा हल्ला घडवल्याचे निष्पन्न झाले होते, हे स्पष्ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.