पिंपरी – सायंकाळचे सहाही वाजले नव्हते… रस्ते, चौक गर्दीने गजबजलेले होते…अशातच एक सराईत गुंड आपल्या साथीदारासोबत येतो आणि भर चौकामध्ये हवेत गोळीबार करतो… तेथील नागरिकांचा थरकाप उडवून पुन्हा पुढच्या चौकात गोळीबारासाठी निघतो…अशा प्रकारे दोन ठिकाणी हवेत सात राउंड फायर करत संपूर्ण शहरामध्ये दहशत माजवितो…ही कोणत्याची चित्रपटाची कथा नसून चिंचवड आणि पिंपरीमध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडलेली घटना आहे.
चिंचवड आणि पिंपरी परिसरात एका सराईत गुन्हेगाराने दोन ठिकाणी हवेत गोळीबार केला. यामध्ये त्याने तब्बल सात गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 6) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पत्रा शेड लिंक रोड चिंचवड आणि भाटनगर पिंपरी येथे घडली. पोलिसांनी आरोपींच्या मागावर पथके तैनात केली आहेत.
या सराईत गुन्हेगाराचे नाव पोलिसांना समजले असून त्याच्यासोबत एक साथीदारही होता. पोलीस या सराईताच्या शोधात आहेत. चिंचवड आणि पिंपरीमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास रिक्षातून आला आणि त्याने हवेत गोळ्या झाडल्या. लिंक रोड वरील पत्रा शेड येथे काही गोळ्या हवेत झाडल्या. त्यानंतर तो पुढे भाटनगर येथे गेला. भाटनगर मधील एका चौकामध्ये त्याने हवेत गोळ्या झाडल्या.
दोन ठिकाणी एकूण सात गोळ्या झाडल्या आहेत. दरम्यान त्याने एकाला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करण्यासाठी धमकावले. तर एकाचा मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चिंचवड ते भाटनगर पिंपरी यादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस पथके आरोपीच्या मागावर पाठवण्यात आली आहेत.