सेऊल : उत्तर कोरियाच्या दोन विद्यार्थ्यांना चित्रपट पाहणे चांगलेच भोवले आहे. या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने दोन विद्यार्थ्यंना चक्क मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा दावा करण्यात आला आहे. उत्तर कोरियामध्ये इतर देशाचे संगीत आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे. कुणीही असे करताना आढळल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जाते.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे वय 16 आणि 17 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी उत्तर कोरियातील रयांगांग प्रांताच्या शाळेत दक्षिण कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिला. तर दुसऱ्या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियन आणि अमेरिकन चित्रपट पाहिल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे, पण या घटनेची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली.
दरम्यान, याआधीही 2021 मध्ये दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. हुकूमशाह किम जोंग उन त्याचे विचित्र नियम आणि क्रूरतेसाठी ओळखला जातो. किम जोंग उन नेहमीच अजब फर्मान आणि नियमांमुळ चर्चेत असतो. उत्तर कोरियातील नागरिक त्रस्त आहेत, पण हे सर्व सहन करण्याशिवाय तेथील जनतेकडे दुसरा पर्याय नाही. उत्तर कोरियामध्ये हुकूमशाह किम जोंग उनने नागरिकांसाठी विचित्र नियम लागू केले आहेत.
अलिकडे किम जोंग उनने नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नव्या आदेशानुसार, देशातील लहान मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाईटच्या नावांवर ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे. किम जोंग उनने देशातील चिमुकल्यांची प्रेमळ किंवा सौम्य भावनांच्या अर्थाची नाव बदलून ती बॉम्ब आणि बंदुक ठेवण्यास सांगितलं आहे. किमच्या मते, यामुळे देशाची ताकद दिसेल असं सांगण्यात येत आहे. मात्र या विचित्र फर्मानामुळे पुन्हा एकदा उत्तर कोरियातील नागरिक संकटात सापडले आहेत.