वानवडी -हडपसर- स्वारगेट बीआरटी मार्गातील बसथांबे काढून टाकण्यात आले होते. येथे नव्याने बस थांबे उभारले नसल्याने प्रवाशांना भरउन्हात थांबावे लागत आहे. जे 16 बस थांबे काढण्यात आले होते. तेथील राडारोडा व रॅम्प अजून तसाच असल्याने प्रवाशांना यातूनच वाट काढावी लागत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. दुरूस्ती करण्यास सुरुवात केली आहे. नवीन बसथांबे उभारणीस सुरुवात केली आहे.
दरम्यान, नवीन थांबे आहे. त्या ठिकाणीच उभारण्यात येणार असल्याने हडपसर- स्वारगेट बीआरटी मार्ग पूर्णतः बंद झाला की, पुन्हा सुरू होणार याबाबत स्पष्टता नसल्याचे दिसत होते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. स्वारगेट- हडपसर दरम्यानच्या बीआरटी मार्गामुळे सतत वाहतूक कोंडी होत होती. अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे या मार्गाला स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींचाही विरोध होता. पालिकेने या टप्प्यातील मार्ग बंद करावा, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने अखेर स्वारगेट ते हडपसर दरम्यानचे 16 बीआरटी थांबे काढले होते. काळूबाई चौक, रामटेकडी, वैदूवाडी, किर्लोस्कर ब्रीज आणि मगरपट्टा या ठिकाणी प्रवासी संख्या जास्त असल्याने एका ठिकाणी दोन थांबे होते. गेल्या आठवड्यात सर्व थांबे काढले. मात्र, रॅम्प, प्लॅटफॉर्मची दुरूस्ती सुरू आहे. याचा राडारोडा प्रशासनाने हटविण्यास सुरूवात केली आहे. रॅम्पवरील पेव्हिंग ब्लॉकची दुरूस्ती सुरू केली आहे. पथदिव्याची दुरूस्त करण्यास सुरूवात केली आहे.