पुणे :- शहरातील खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असून मंगळवारी संध्याकाळी कोंढवा भागात तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला. दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला. कोंढव्यातला हा मागील दहा दिवसांतला तीसरा खून आहे.
विठ्ठल रामदास धांडे (वय , रा. कृष्णानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश लाला म्हस्के (रा.कोंढवा) याच्या विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विठ्ठल आणि आरोपी आकाश हे एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघे दारू पित बसले होते. त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाले. याचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात आकाश याने विठ्ठल याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले. मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी आरोपीची आई, बहिण व मावस भाऊही होता. यातील आई व बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.