मुंबई – ब्ल्यूचीप कंपन्यांच्या शेअरची खरेदी चालूच राहिल्यामुळे शेअर निर्देशांकांत आज दीड टक्क्यांची वाढ झाली. गेल्या चार दिवसापासून शेअर निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. बाजार बंद होताना मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी म्हणजे 1.54 टक्क्यांनी वाढून 39,574 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 159 अंकांनी वाढून 11,662 अंकांवर बंद झाला.
आजच्या तेजीचे नेतृत्व एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेने केले. आमची उलाढाल पूर्ववत झाली असल्याचे या दोन संस्थांनी सांगितले आहे. एचडीएफसीचा शेअर आज आठ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर वाढले. मात्र टाटा स्टील, नेस्ले, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 236 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारही सक्रिय झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्पितळातून व्हाईट हाऊसमध्ये परत आल्यानंतर जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले. अमेरिकन सरकार दुसरे पॅकेज लवकरच जाहीर करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.