बंगळुरू – पतीच्या काळ्या वर्णावरून त्याचा अवमान करणे ही क्रूरताच असून घटस्फोटासाठी हे ठोस कारण ठरू शकते असे नमूद करत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका 44 वर्षीय व्यक्तीची घटस्फोटाची मागणी मान्य केली.
यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नमूद केले की उपलब्ध साक्षींवरून हे कळते की पत्नी पतीच्या काळ्या वर्णावरून त्याला वारंवार अपमानित करत होती. याच कारणामुळे ती पतीचे घर सोडून निघून गेली. हे तथ्य लपवण्यासाठी पत्नीने पतीवर अवैध संबंधांचे खोटे आरोपही केले.
हा सगळा क्रूर प्रकार आहे असे नमूद करत न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर केली. संबंधित प्रकरणातील जोडप्याचा 2007 मध्ये विवाह झाला होता आणि त्यांना एक मुलगीही आहे. 2012 मध्ये पतीने बंगळुरूतील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.
त्यानंतर पत्नीनेही कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातील कायद्याचा आधार घेत पती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याही पुढे मुलीला सोडून ती आपल्या आई वडिलांसोबत राहण्यास निघून गेली होती.