नगर – शिवसेनेकडून अनिल राठोड यांना उमेदवारी माळाल्याने शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी मंगळवार (दि.1) रोजी शिवालयात उपस्थिती लावली. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनिल शिंदे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हेही आता राठोड यांच्यासाठी सक्रिय झाले असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात अनिल राठोड यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम हेही या बैठकीला हजर राहिले. बैठक संपल्यानंतर अनिल राठोड व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे शिवालयात गेले असता, त्याठिकाणी अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड यांनी येऊन राठोड यांची भेट घेतली व शिवसेनेत सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, शिवसेनेकडून महापौरपद देण्यात न आल्याने अंबादास पंधाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तर, मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत राजेंद्र राठोड यांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडत हातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ बांधले होते. अंबादास पंधाडे व राजेंद्र राठोड यांनी आज शिवालयात उपस्थिती लावत पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले असल्याचे दिसत आहे.