पुणे – मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट चेंबरच्या निवडणुकीत झालेले एकूण मतदान आणि उमेदवारांना पडलेल्या मतांमध्ये गोळाबेरीज लागत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता चेंबरने बहुमताच्या जोरावर गुरुवारी (दि.3) फेरमतमोजणी घेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप दिनेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
चेंबरच्या निवडणुकीत 426 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 25 मतांची गोळाबेरीज लागत नव्हती. त्यामुळे आम्ही फेर मतमोजणी घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु, त्यावर चेंबरने फेर मतमोजणी घेता येणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर आम्ही कंपनी कायद्याप्रमाणे सभासदांच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त सह्या घेऊन फेर निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे दि पूना मर्चंट चेंबरने गुरुवारी (दि.3) संचालकांच्या कार्यकारणीची बैठक घेऊन बहुमताच्या जोरावर पुन्हा फेरमातमोजणी घेण्याचा घाट घातला आहे.
तसेच 70 दिवसांनंतर मत मोजणी करणे चुकीचे आहे. त्यावर आता कितपत विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुमताच्या जोरावर न्याय नाकारणाऱ्या संचालक मंडळावर आमचा विश्वास राहिलेला नाही. याबाबतचा संपूर्ण अधिकार हा चेंबरच्या सभासदांचा आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा घेण्याऐवजी चेंबर इतर मार्ग शोधत आहे. आम्हाला त्यामध्ये उपस्थित रहावे व जो निर्णय होईल तो बंधनकारक आहे, असे कळवले आहे. परंतु, संचालक मंडळाचा कोणताही निर्णय आमच्यावर बंधनकारक नाही. सर्वसाधारण सभेत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. याबाबत नोटीसद्वारे आम्ही चेंबरला कळवले असल्याचेही मेहता यांनी यावेळी सांगितले. याविषयी चेंबरचे संचालक राजेंद्र बाठीया म्हणाले, चेंबरच्या काही विद्यमान संचालकांनी भुसार बाजारातून निवडणूक नको म्हणून फेर मतमोजणी घेण्यात यावी यासाठी काही व्यापाऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. परंतु, सही घेताना त्यांनी व्यापाऱ्यांना वेगळं पत्र दाखवले आणि कार्यकारणीच्या सभेत त्यांनी दुसरच पत्र जोडून दिले आहे. त्यामुळे ही चेंबरच्या सभासदांची फसवणूक आहे. याबाबत विशेष कार्यकारणी सभा घेऊन निर्णय घेण्यात यावा.
दि पुना मर्चंट्स चेंबरच्या निवडणुकीत 25 मतांची गोळा बेरीज होत नाही. त्या संदर्भात चेंबरच्या 323 सभासदांनी पत्राद्वारे कळविले आहे की, निवडणूक न घेता फेर मतमोजणी घेण्यात यावी. त्यामुळे आम्ही याबाबत गुरुवारी (दि.3) कार्यकारणी बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन तत्काळ फेरमतमोजणी घेतली जाणार आहे. हे सर्व सभासदांच्या मागणीनुसारच करत आहोत.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर