पुणे – मुंबई विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महामंडळाने सुरू केलेल्या शिवनेरीच्या प्रत्येक फेरीत सरासरी 90 टक्क्यांहून अधिक आसनांचे आरक्षण होत आहे. कॅब व खासगी वाहनांच्या तुलनेत शिवनेरीचा तिकीट दरही कमी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
मुंबई-पुणे दरम्यान शिवनेरी सुरू करण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांनी सार्थ ठरवला आहे. बेस्ड टॅक्सी, कूलकॅब, खासगी बस यांच्या स्पर्धेत एसटीची शिवनेरी वाजवी दरात दर्जेदार सेवा देत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांमधून शिवनेरीला प्रतिसाद वाढत आहे. मुंबई विमातळाहून पुण्याला जाण्यासाठी कॅबचालक 2500 ते 3200 भाडे घेतात. याच मार्गावर “ओला-उबर’ने प्रवास केल्यास गाडीनुसार 2200 ते 3000 रुपये मोजावे लागतात. या उलट या प्रवासासाठी शिवनेरीचे अवघे 525 रुपये तिकिट आहे.
खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित प्रवास मिळत आहे. खासगी वाहन चालक महामार्गावर बेदरकारपणे गाडी चालवतात. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. या उलट मर्यादित वेग आणि सुरक्षित प्रवास यामुळे एसटीवरील विश्वासार्हता कायम आहे.