महिला दिन विशेष : राष्ट्राभिमानी अरुणा असफअली

काही व्यक्तींचा जन्म हा इतिहास घडविण्याकरिता असतो. नेतृत्व करण्याकरिता असतो. अशा व्यक्तीला धर्म, जातपात, रूढी, परंपरा यांचे बंधन नसते. समाज हाच त्यांचा धर्म असतो, तर अन्यायाविरुद्ध लढणे हे त्यांचे जीवनकार्य असते. जातीपातीपलीकडची संस्कृती मानवतेच्या संस्काराने त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असते. असेच असमान्य व्यक्तिमत्त्वाचा वारसा जन्मतःच जिला लाभला ती तेजस्वी तारका 16 जुलै, 1908 रोजी उपेंद्रनाथ गांगुली आणि अंबिकादेवी यांच्या घरात जन्मली. अतिशय कर्मठ ब्राह्मण कुटुंबात तिच्या बाळलीला आणि बोबडे बोल साकारले. महान कविवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या घराण्याशी गांगुली घराण्याचा खूप जवळचा संबंध होता.

अरुणा गांगुलीचे शिक्षण लाहोर व नैनिताल येथील ख्रिश्‍चन मिशनरी संस्थेत झाले. नंतर त्या गोखले मेमोरियल स्कूल कोलकात्याला होत्या. अलाहाबाद येथे त्यांची मैत्री एम. असफलअलींशी झाली. ते व्यवसायाने वकील आणि कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. अरुणा व एम. असफअलींच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात व नंतर विवाहात झाले. असफअलींचे वय अरुणापेक्षा 23 वर्षांनी जास्त होते, त्यात धर्म मुस्लिम. हे सर्व गांगुली परिवार स्वीकारणे केवळ अशक्‍यच होते; परंतु साहस, धडाडी, निष्ठा आणि शिक्षण यांचे वर्चस्व असलेल्या अरुणाच्या मनाला हे अडथळे रोखू शकले नाहीत.

अरुणाताईंची तात्त्विक बैठक असफअलींना मानवली नाही. पेलवली नाही. तत्त्वांशी तडजोड करणे तर अरुणाताईंना शक्‍यच नव्हते. त्याचा परिणाम अर्थातच कठोर होता. असफअली अमेरिकेत निघून गेले. एकट्या राहिलेल्या अरुणा असफअली खचून न जाता जिद्दीने पुन्हा कामात सक्रिय झाल्या. मात्र तत्त्वाकरिता लढणाऱ्या मनाला गांधीवाद, नेहरूवाद आणि समाजवादाच्या संगमावर नेहमीच हेलकावत राहावे लागले. मनात प्रखर राष्ट्रनिष्ठा, स्वातंत्र्यप्रेम आणि गरिबांविषयी तळमळ होती, तर कोणत्याही पक्षाच्या
धोरणात या तत्त्वांशी तडजोड हे समीकरण होते. त्यामुळे त्या फार काळ कुठल्याही पक्षात स्थिरावत नव्हत्या; परंतु लोकहिताच्या कुठल्याही कार्यात त्या मागे सरत नव्हत्या. 1930 साली गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहातून त्यांचे राजकारणातले पडसाद लोकांना जाणवले. जेव्हा त्यांनी लोकांना उद्देशून भाषण दिले. त्यामुळे ब्रिटिशांचेही धाबे दणाणले. त्यांनी अरुणा असफअलींना पकडण्याचे आदेश काढले; पण भूमिगत अरुणा असफअलीने ब्रिटिशांच्या हाती तुरी दिल्या. पुढे 1932 साली त्यांना अटक होऊन तिहार जेलमध्ये ठेवले गेले.

गवालिया टॅंकवर 8 ऑगस्ट, 1942 रोजी गांधीजींची विराट जाहीर सभा झाली. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला तो अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. त्याचवेळी गांधीजींनी “चले जाव’चा नारा दिला आणि “करेंगे या मरेंगे’ असे चैतन्य सर्व नेत्यांपासून तळागाळाच्या कार्यकर्त्यात सळसळले. दुसऱ्या दिवशी गवालिया टॅंकवर राष्ट्रीय ध्वज फडकवून “चले जाव’, “भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात करण्याचे ठरले. मात्र ब्रिटिश सरकारने रातोरात देशभरातील सर्व राजकीय नेत्यांना कैद करून तुरुंगात डांबले. नेताच नसेल तर जनमुदाय काय करेल? ही त्यांची भावना होती.दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी गवालिया टॅंक हजारो सत्याग्रहींनी फुलला होता, प्रचंड पोलीस बंदोबस्त तेथे तैनात होता. सत्याग्रही नेत्यांची वाट पाहत होते. ध्वज कोण फडकावणार? हाच प्रश्‍न सर्वांच्या मनात होता. समुदायाचे समीकरण हेच असते. ते नेत्यांच्या मागे जातात; पण समुदायाला पुढे नेण्याकरिता मात्र खंबीर नेतृत्व असावे लागते. असे नेतृत्व गजाअड होते. हे क्षणात अरुणा असफअलींच्या लक्षात आले आणि विजेच्या गतीने या विद्युल्लतेने राष्ट्रध्वज हाती घेऊन तो त्वेषाने फडकवला. सत्याग्रहींमध्ये उत्साह सळसळला. त्यांनी पोलिसांना न जुमानता एकच जल्लोष केला. खऱ्या अर्थाने “चले जाव’, “भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली. चैतन्याची नायिका होती अरुणा असफअली. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्राभिमान म्हणूनच नसानसातून वाहत होता.

अरुणा असफअली जेव्हा त्या भूमिगत राहून कार्य करायच्या तेव्हा त्यांना पकडण्याकरिता ब्रिटिश सरकारच्या नाकात दम यायचा. एकदा तर त्यांनी चक्क अरुणा असफअलींना जो पकडून देईल त्याला 5000 रु.चे बक्षीसही जाहीर केले होते. यावरूनच त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात येतो. 1953 साली असफअलींच्या निधनाने त्यांच्या मनाने दुःखाचे पडसाद झेलले; पण त्यातूनही स्वतःला स्थिर ठेवत हिंदू-मुस्लीम संबंध, कापड गिरणी कामगारांचा लढा, मुंबईतील नौसैनिकांचे बंड, स्त्रियांचे हक्क, बंगालचा दुष्काळ, भारताचे परराष्ट्र धोरण, फाळणीचा प्रश्‍न, या सर्वच ठिकाणी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

1954 मध्ये त्यांनी स्त्री-पुरुष समान हक्कासाठी “नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन’ संस्थेची स्थापना केली. 1958 साली त्या निवडणूक जिंकल्या आणि दिल्लीच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. झोपडपट्टीतली स्वच्छता, पाणी, आरोग्य यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आणीबाणीच्या तिरस्कातून त्यांनी पदत्याग केला. अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. बरीच वर्षे त्या अखिल भारतीय महिला संघटनेच्या अध्यक्षा होत्या. 1962 ला त्यांनी “पॅट्रियट’ हे दैनिकही सुरू केले. अविश्रांत मेहनत आणि जनसेवा हेच त्यांचे ब्रीद होते. त्याकरता वेगवेगळ्या माध्यमात आणि पक्षात त्यांनी काम केले.

अरुणा असफअली यांच्या अफाट कार्याची दखल शासकीय व अशासकीय संस्था, संघटनांनी घेतली. सरकारने त्यांना राहण्यास शासकीय घर दिले. मात्र, त्यांनी ते नाकारले व आयुष्यभर भाड्याच्या घरात वास्तव्य केले. जनसमान्यांसोबतच त्यांनीही आपला प्रवास नेहमी “पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मध्ये केला. 1975 साली त्यांना “लेनिन पुरस्कार’ देऊन गौरवले गेले. 1991 साली आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या जवाहरलाल नेहरू पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. 1987 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, तर 1992 सालचा “पद्मभूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाला. अतिशय धाडसी, मानी, राष्ट्राभिमानी, तत्त्वनिष्टा अशा या सौंदर्यवतीचे आयुष्य विविध घटनांनी गुंफलेले होते. या गतिमान, तेजस्वी जीवनाला शांतता मिळाली ती 29 जुलै 1996 ला. अशा कुठल्याही असामान्य कर्तृत्वाला फक्त मृत्यूच रोखू शकतो हे सत्य सर्वांना पटले; पण केलेले कार्य मात्र कायम इतरांना प्रेरणादायी ठरते. या प्रेरणास्रोतातून त्यांचे विचार कायम अमर राहतात. म्हणूनच या अमर कार्याला शासनाने त्यांच्या मृत्यूनंतर “भारतरत्न’ म्हणून मानवंदना दिली. त्यांच्या नावाने टपाल तिकीट काढले. अनेक सेवाभावी संस्था, हॉस्पिटल, मेमनोरियल ट्रस्टद्वारे अरुणा असफअली आजही मरणोत्तर इतरांना साह्यच करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.