राष्ट्रवादीच्या मुलाखतीला शिवेंद्रसिंहराजेंची पाठ 

अजित पवारांची सारवासारव : माणमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच
सातारा  – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठ फिरविली. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नाराजीचे अप्रत्यक्ष कारण पवारांनी सांगितले.

राष्ट्रवादी भवन, सातारा येथे गुरूवार, दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरूवात झाली. आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती झाल्या. मात्र, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुलाखतीकडे पाठ फिरविली.

दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजेंनी इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला नाही व त्याचबरोबर ते आज अनुपस्थित राहिले, याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारणा केली. त्यावर पवार म्हणाले, आ. शिवेंद्रसिंहराजेच नव्हे तर माझ्यासह राजेश टोपे व इतरांनासुध्दा कामाच्या व्यापामुळे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल करता आला नाही. मात्र, पुढे चूक सुधारली जाईल, असे सांगून पवार म्हणाले, लोकसभेला अर्ज दाखल न करता उमेदवारीचा निर्णय झाला असल्याचे कारण आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. त्याचबरोबर नुकतीच पुणे येथे खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत ना.रामराजे ना.निंबाळकर व जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीला आ.शिवेंद्रसिंहराजे देखील उपस्थित होते.

त्यामुळे आ.शिवेंद्रसिंहराजे नाराज आहेत, असे तर्क लावणे चूकीचे ठरेल असे पवारांनी सांगितले. आ.शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात असून देखील मुलाखतीला उपस्थित का राहू शकले नाहीत ? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, आ.शिवेंद्रसिंहराजे यांना सकाळी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते व्यायामासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांच्याशी मी पुन्हा एकदा बोलणार आहे, असे पवारांनी सांगितले.

दरम्यान, पवारांच्या उपस्थितीत माण-खटावमधून सर्वाधिक इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यावेळी प्रभाकर देशमुख, प्रा.कविता म्हेत्रे, संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, सुर्यकांत राऊत, सुहास पिंगळे यांनी मुलाखती दिल्या. त्याचबरोबर फलटणमधून आ.दिपक चव्हाण यांच्यासह अशोक माने, प्रा.डॉ.अनिल जगताप, प्रा.शिवकुमार शिंदे तर कराड-दक्षिणमधून ऍड.राजाभाऊ उंडाळकर, अमित पाटील यांनी मुलाखती दिल्या.

ना. रामराजेंची उशिरा एंट्री
सर्व मतदारसंघाच्या मुलाखती संपल्यानंतर ना. रामराजे ना. निंबाळकर राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले. मात्र, अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. जिल्हाध्यक्षांच्या दालनात थांबून एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पवारांसोबत वाईच्या दिशेने रवाना झाले.

राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते म्हणून अजित पवारांची ओळख. मात्र, सत्ता गेल्यानंतर नेत्याचे राजकीय वजन कमी होते, याचा प्रत्यय गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथे दिसून आला. अजित पवारांच्या उपस्थितीत मुलाखतीला विद्यमान आमदार, इच्छूक उमेदवार व मोजके काही नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन परिसरात एकेकाळी होणाऱ्या गाड्यांची संख्या यावेळी रोडावल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)