पुणे बार असो. अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांची माहिती : प्रस्ताव सादर
उच्च न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजीनगर न्यायालय सील करण्यात येणार आहे. मर्यादित आणि आवश्यक लोकांना न्यायालयात प्रवेश दिला जाणार आहे.
आता थेट न्यायालयात जाण्यासाठी तीन गेट निर्माण करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करून पास दिल्यानंतरच मर्यादित वकील आणि पक्षकारांना इमारतीत जाता येणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, आराखडा पुणे जिल्हा बार असोसिएशनने (पीबीए) उच्च न्यायालयाला पाठवला आहे. त्यात पत्रे मारून न्यायालयातील प्रवेश मर्यादित ठेवण्याबाबत बाबत काही मार्ग सुचवण्यात आले आहेत. आतील बाजूचे पार्किंग आणि काही परिसर सील करण्यात येणार आहे.
याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक म्हणाले, “न्यायालयात येण्यासाठी गेट नंबर तीन आणि चार खुले असणार आहे. वकील, पक्षकार वाहन घेऊन न्यायालयात आल्यानंतर त्यांना थेट इमारतीत जाता येणार नाही. कारण पार्किंगचा सर्व परिसर पत्रे मारून सील असेल. संबंधित व्यक्ती गेटवरच सॅनिटायइझ केला जाईल. त्यानंतर त्यांच्या प्रकरणाची माहिती घेऊन पास दिला जाईल.
न्यायालायत गर्दी होणार नाही. कामकाज सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज आम्ही उच्च न्यायालयास दिला आहे. मात्र, पुण्यातील परिस्थिती पाहता तूर्तास न्यायालय सुरू होतील, असे वाटत नाही. पण, जेव्हा न्यायालये सुरू होतील तेव्हा काय खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचे नियोजन आम्ही करून ठेवले आहे. त्यास उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात येणार आहे.