नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात धोलवड येथे 3, सावरगाव येथे 2 व त्यानंतर सोमवार (दि. 25) मांजरवाडी येथे एक महिला बाधित आढळल्याने तालुक्यात महिन्यात रुग्णांची संख्या सहावर पोहचली आहे. बाधित रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. बधितांची संख्या वाढल्यास जुन्नर तालुका रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.
धोलवड, सावरगावमध्ये रुग्ण आढळून आल्यानंतर नारायणगावजवळील सहा किलोमीटर अंतर असलेल्या मांजरवाडी येथे (दि.25) दुपारी चार वाजता 35 वर्षीय विवाहित महिला बाधित असल्याचे समजले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठविले आहे. ही महिला (दि. 21) मुंबई येथील भांडुप येथून दोन मुलासह मांजरवाडी येथे माहेरी आली होती.
दरम्यान, त्यांना सर्दी, खोकला असल्याने प्राथामिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने तपासणी केली. तसेच त्यांना लेण्याद्री येथे संस्थांत्मक विलगीकरण केले होते. त्यानंतर पुणे येथे तपासणीसाठी त्यांचे सॅम्पल पाठविले होते. त्याचा अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल येताच मांजरवाडी गाव बंद ठेऊन सील करण्यात आले आहे. त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना संस्थांत्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.
बेशिस्तीचेच दर्शन
जुन्नर तालुक्यात करोनाने हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या जुन्नर तालुक्याचा समावेश आता रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे. सावरगावातील बाधितामुळे नारायणगाव शहरातील नागरिकांची झोप उडाली आहे. दैनदिन व्यवहार सुरूळीत होत असताना बाधिताची भटकंती जीवाला घोर लावणारी ठरली आहे. या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
नारायणगाव आजपासून बंद
सावरगाव येथील करोना बाधित रुग्ण शनिवार (दि.23) नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन तपासणी करून गेला होता. यादरम्यान ही बाधित व्यक्ती नारायणगाव येथील काही दुकानामध्ये खरेदी करून गेल्याची माहिती नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी दिली. त्यामुळे नारायणगाव व वारूळवाडी परिसरात घबराटीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाधित व्यक्ती कोणत्या दुकानांमध्ये गेली, याचा शोध आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग घेत आहे. नारायणगाव व वारूळवाडी परिसरातील सर्व व्यवहार दि. 26 ते 31 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.