कोल्हापूर (प्रतिनिधी) – जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या “इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन’ (आयएसओ) या संस्थेकडून शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी “आयएसओ-9001:2015′ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. “आयएसओ’ प्रमाणपत्रामुळे शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ट्यू सूद साऊथ एशिया प्रा.लि. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय वृद्धी) अनिल साळवी आणि कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजीत पाटील उपस्थित होते.