बरोबरीसाठी आफ्रिकेला संधी
बंगळुरू: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रविवारी येथे होणारा तिसरा टी-20 सामना जिंकून मालिकेतही विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक झाला आहे. हा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्याची संधी आफ्रिका कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतास विजय मिळाला होता.
भारताने दुसऱ्या सामन्यात सहज विजय मिळविल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आजही त्याचीच पुनरावृत्ती करण्यात भारतास अडचण येणार नाही अशी आशा आहे. सध्या अपयशाने त्रस्त असलेला ऋषभ पंत याला येथे सूर सापडणार की नाही याचीच उत्कंठा आहे. कागिसो रबाडा याच्यासह आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना सामोरे जाताना भारतीय फलंदाजांना अडचण येईल अशी हवा निर्माण झाली होती. प्रत्यक्षात या गोलंदाजांना फारसा प्रभाव दाखविता आलेला नाही.
रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीकडून भक्कम पायाभरणीची अपेक्षा आहे. भारताचा ‘मॅचविनर’ म्हणून बीरूद लाभलेला विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत दीपक चहार व नवदीप सैनी यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हीच आफ्रिकेपुढील समस्या आहे. कर्णधार क्विन्टॉन डीकॉक, डेव्हिड मिलर, रेजा हेन्ड्रीक्स यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे. भारतीय फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डीकॉकला आपल्या गोलंदाजांचा कल्पकतेने उपयोग करावा लागणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी संघाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना आज विजय मिळविणे अनिवार्य आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
सामन्याची वेळ- सायंकाळी 7 वाजल्यापासून – भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्ट्रीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहार, खलील अहमद, दीपक चहार, नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका-क्विन्टॉन डीकॉक (कर्णधार), रासी व्हानडर डुसेन (उपकर्णधार), तेम्बा बावुमा, ज्युनिअर डेला, बियोर्न फॉर्टुन, ब्युरन हेन्ड्रीक्स, रेजा हेन्ड्रीक्स, डेव्हिड मिलर, एन्रीच नोर्टजे, अँडील फेहलुक्वायो, द्वायने प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तॅबरेज शमसी, जोनजोन स्मुट्स.