किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची वर्दळ ः टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर बाल वारकऱ्यांनी धरले रिंगण
जुन्नर -फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार होणारी शिवजयंती पारंपरिक पद्धतीने किल्ले शिवनेरीवर साजरी करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर बाल वारकऱ्यांनी धरलेले रिंगण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते.
याप्रसंगी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे महत्त्व जनतेला पटवून देणे गरजेचे असल्याचे मत मोहन शेटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 12) सकाळी मोहन शेटे यांनी सपत्नीक शिवाई मातेचा अभिषेक केला. नंतर पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात शिवजन्मस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. जुन्नरमधील भोई समाजातील युवकांनी ही छबिना पालखी खांद्यावरून गडावर नेली. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी पाळणा गीत म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केला. या प्रसंगी यानंतर सुंठवड्याचे याचे वाटप करण्यात आले.
ध्वजारोहण, शिवकुंज वास्तूतील बालशिवाजी व जिजाऊंच्या शिल्पास अभिवादन, पोवाडे गायन, धर्मसभा व मान्यवरांचे सत्कार झाल्यानंतर या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार मनीषा आकाराम कवडे यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सज्जनगडावरून आलेले विद्यार्थी रामदासी व देहूचे अमोल मोरे यांनी महाराजांच्या शिल्पास महावस्त्र अर्पण केले. तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे 41वे वर्ष असून यंदा नेहमीच्या तुलनेत शिवभक्तांची संख्या कमी होती.
याप्रसंगी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे संजय खत्री, शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विजय दुराफे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संभाजी तांबे, राहुल गाजरे, जितेंद्र देशमुख, धनंजय कुलकर्णी, श्याम शास्त्री, संजय मुथा, रमेश कर्पे, संदीप धानापुणे, वसंत साळवे, सुरेश परदेशी व विविध भागातून आलेले शेकडो शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर काजळे यांनी केले तर गोविंदराव हिंगे यांनी आभार मानले.