पुणे : राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत असले तरी पुण्यात गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांच्या भूमीपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे, शहर शिवसेनेत नाराजीचा सूर असून भाजपच्या या कारभाराबाबत थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. शहरात सातत्याने हे प्रकार होत असल्याने कार्यकर्त्यांना काय उत्तरे द्यायची यावरूनही शिवसेनेचे शहर पदाधिकारी कोंडीत सापडले आहेत.
राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतर नाटयानंतर शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप पुण्यातही एकत्र आले आहेत. अद्याप महापालिका निवडणूकाचा कार्यकाल अनिश्चित असल्याने महापालिकेत लोकप्रतिनिधीही नाहीत अशा स्थितीत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना सातत्याने वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्कात रहावे लागत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या माध्यमातून होणारे कार्यक्रम भाजपकडून हायजॅक केले जात असून या कार्यक्रमांना भाजप नेत्यांनाच निमंत्रित केले जात आहे.
तसेच, कार्यक्रमांचे नियोजन करताना शिवसेनेलाच विश्वासातच घेतले जात नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळीही बालेवाडी येथे महापालिकेच्या चार प्रकल्पांचे भूमीपूजन तसेच उद्घाटनाचे कार्यक्रम होते. या कार्यक्रमाला आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने मात्र शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्याची तसदीही घेण्यात आली नाही.
परिणामी, शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता या शिवाय, व्यासपीठावरही केवळ भाजपच्या आमदार तसेच शहर पदाधिकाऱ्यांसाठीच बैठक व्यवस्था होती. हा प्रकार वारंवार होत असल्याने शिवसेना भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडूनही जाणून-बुजून शिवसेनेला दूर ठेवले जात असल्याची चर्चा आहे.
नाराजी पालकमंत्र्यांच्या दारात
दरम्यान, हा प्रकार वारंवार होत असल्याबाबत शिवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, या नाराजीवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील दोन दिवसात बैठक बोलविली असल्याचे सांगण्यात येत असून भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीच्या माहितीस दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.