मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रभादेवी परिसरात हाणामारी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळत आहे. धारावीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने नवा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे./
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला असून पोलिसांनी ठाकरे गटातील सात – आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेश सूर्यवंशी, मुथू पठाण, चेतन सूर्यंवशी यांच्यासह इतर चार ते पाच कार्यकर्त्यांविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविद कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिडन फ्रान्सिस फर्नांडो यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी मिल कंपाऊंड येथील मॉर्निंग स्टार शाळेत सदा सरवणकर गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या बैठकीदरम्यान पुन्हा वाद झाला आहे.
दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करीत शिवसैनिकांना शांत केले. त्यानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.