मुंबई – वरळी विधानसभा मतदार संघामध्ये मंगळवारी शिवसेनेने ‘केम छो वरळी’चे फलक लावले होते. या मतदारसंघातून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. मात्र, आज वरळीमध्ये पुन्हा शिवसेनेची विविध भाषांमध्ये पोस्टरबाजी दिसून आली आहे. मंगळवारी गुजराती भाषेत केम छो वरळी चे आदित्य ठाकरेंचे फलक झळकल्यानंतर आता मराठी, उर्दू, इंग्रजी, बंगाली अशा विविध भाषांमध्ये पोस्टर्स झळकले आहेत.
Mumbai: Shiv Sena puts up posters of Aditya Thackeray which say ‘How are you Worli?’ in different languages. He is contesting #MaharashtraAssemblyPolls from Worli constituency. https://t.co/kurUjKEGT7 pic.twitter.com/CpgCaGr1r1
— ANI (@ANI) October 2, 2019
आदित्य ठाकरेंच्या ‘केम छो वरली’ या पोस्टरला नेटकऱ्यांनी मंगळवारी चांगलच धारेवर धरल होत. शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता केम छो वरली म्हणतोय वा रे राजकारण, दादा काय झाल मराठीचा विसर पडला का? यासारख्या अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटल्या होत्या. आता या विविध भाषेंमधील पोस्टर्सवर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया असणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वरळी मतदारसंघात तब्बल 25 हजार गुजराती भाषिक मतदार आहेत. या मतदारांना त्यांच्याच भाषेत आकर्षित करण्यासाठी शिवसेनेला आता मराठी ऐवजी गुजराती भाषेचा आधार घ्यावा लागतोय. या मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज सचिन अहिर यांचा पराभव केला होता. साहजिकच अहिर डोकेदुखी ठरू नयेत यासाठी शिवसेनेने अहिर यांनाच पक्षात ओढून घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा झाला आहे.
मात्र, शिवसेनेच्या युवराजांचा विजय कमी मताधिक्याने झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम टाळण्यासाठी सेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. आदित्य ठाकरे आज पासूनच प्रचाराच्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. नवरात्रोत्सवात तिथल्या मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी ही ते चर्चा करणार आहेत.