पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी निवडणपक कार्यालयात गर्दी केली. उमेदवारी मिळेल तेव्हा मिळेल, अर्ज जमा करू अशी भूमिका अनेक इच्छुकांनी घेतली आहे. आतापर्यंत 27 उमेदवारांनी 59 अर्ज घेऊन गेले आहेत. परंतु, अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसून, दि.3 आणि 4 ऑक्टोबर रोजी सर्व उमेदवार अर्ज भरणार असल्याचे दिसून येते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील केवळ युतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे ही नावे जाहीर होताच अर्ज भरण्यासाठी उमेदवार गर्दी करणार.
मंगळवारी दिवसभरात 6 जणांनी 13 अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजपचे आमदार भिमराव तापकीर, शिवसेनेचे रमेश कोंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन दोडके, मनसेचे कैलास दांगट यांचा समावेश आहे.
दरम्यान, खडकवासला मतदारसंघाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून कामकाजाची दैनंदिन माहिती गोळा करण्यात येत आहे. प्रत्येक कामकाजाचे व्हिडीओग्राफींग करण्यात येत असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारांच्या सोबत असलेल्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे लोकांना आत जाऊ दिले जात आहे.