पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या पुण्यातील फुरसंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची गुरूवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयाना शिवसेनेच्या वतीने 10 लाख रुपयांची मदत सुपूर्द केली.
या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली आहे. तसेच, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. 31 जुलै अखेरपर्यंत 15,500 हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू केली असल्याचेही त्यांनी ट्विट करीत सांगितले.
याप्रसंगी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई आणि आमदार तानाजी सावंत, स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.