मुंबई – भारताने रशियाकडून तेलाची आयात करण्याचे शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी कौतुक केले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेले उत्तर “सुपर्ब’ आहे, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी जयशंकर यांचे कौतुक केले आहे.
भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेला शिवसेना आता कट्टर प्रतिस्पर्धी बनला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदार महिलेने सरकारचे कौतुक करणे ही गोष्ट आश्चर्य वाटावी अशी आहे.
चतुर्वेदी यांनी जयशंकर यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि त्याला “सुपर्ब’ अशी कॉमेंटही केली आहे. वॉशिंग्टनमधअये जयशंकर यांना एका पत्रकाराने रशियाकडून तेल आयात करण्याबाबत एक प्रश्न विचारला होता.
त्यावर “तुम्ही युरोपावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आम्ही तेल खरेदी केले आहे. कारण उर्जा सुरक्षेसाठी ते गरजेचे होते. मात्र आम्ही खरेदी केलेल्या तेलाचे प्रमाणही लक्षात घेतले पाहिजे. आम्ही महिन्याभरासाठी खरेदी केलेले तेल संपूर्ण युरोपात एका दिवशी वापरल्या जाणाऱ्या तेलापेक्षाही कमी आहे.’ असे जयशंकर म्हणाले होते.