शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वारांवर गुन्हा

हितेश मुलचंदानीच्या खूनावर राजकारण : डब्बू आसवाणी यांची पोलिसांत तक्रार

पिंपरी – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पिंपरी येथे हितेश मूलचंदानी या तरुणाचा दि. 23 जुलै रोजी खून झाला होता. या खून प्रकरणाला आता राजकीय वळण लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हितेशच्या खूनाच्या घटनेवरून राजकारण सुरू असून, ते थांबवून आम्हाला न्याय पाहिजे आहे, अशी मागणी खून झालेल्या हितेश याचे वडील गोदूमल मूलचंदानी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.

तर माजी उपमहापौर हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांनी पिंपरीचे शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बदनामी केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार आमदार चाबुकस्वार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रका परिषदेत दिली.

समाजातील लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून चारित्र्य खराब करण्याचे काम करण्यात येत असून, माझी बदनामी करण्यात येत आहे, असे डब्बू आसवानी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हितेश मूलचंदानी याच्या खूनप्रकरणी लोकांना दमदाटी करून दबाव आणत आहेत, अशी तक्रार आसवानी यांनी दिली आहे. त्यानुसार आमदार चाबुकस्वार यांच्यासह जितू मंगतानी, सुरेश निकाळजे, राजू नागपाल व किशोर केशवानी यांच्या विरोधात बुधवारी (दि. 7) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसवानी याबाबत म्हणाले, राजकीय हेतूने प्रेरित होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधात प्रचार व प्रसार केला जात आहे. हितेश मूलचंदानी यांच्या वडिलांवर दबाव आणला जात आहे. त्यांना फोन करून त्रास देण्यात येत आहे. त्याबाबतचे फोन रेकॉर्डींग, तसेच माझ्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित केलेले मॅसेजचे डिटेल्सफ माझ्याकडे आहेत. पिंपरीतील वातावरण अशांत करून तणाव निर्माण करण्याचा संबंधितांचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी आसवाणी यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.